Monday, June 13, 2011

Gandhiji and Spirituality

Project Report
On
"Gandhiji And Spirituality"

In Marathi Language


Submitted to the
Yashavantrao Chavan Maharashtra Open University, Nasik


In partial fulfillment of the
"Diploma in Gandhi Vichar Darshan"
                                                          For      
Course Code No. OPN 075



By
Dr. Anil Purushottam Rampurkar
PRN- 201007003270724
Seat No. VG10100019





Examination Centre
Mahila Mahavidyalaya, Parbhani.
Centre Code No. 8710A





गांधीजींचे आध्यात्मिक विचार


गांधीजींचे जीवन म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या असामान्य बनण्याची कथा आहे. त्यांचे एक वैशिष्ट होते की एकदा केलेली चुक त्यांनी पुनश्च केली नाही. त्यांच्या नैतिक प्रगतीची ही किल्ली होती. त्या चुकांमधून ते बदलत गेले. यातून त्यांच्या नित्यविकासशिलता या गुणाचा विकास झाला. गांधीजींना सामान्यत: शास्त्रांबद्दल आदर होता. परंतु त्यांनी शास्त्रांना तर्काने तपासून पाहिले आणि तर्काच्या कसोटीवर खर्‍या न उतरणार्‍या शास्त्रवचनांचा त्यांनी अव्हेर केला. तसे तर याबाबतीतली अखेरची कसोटी त्यांच्या अंतरात्म्याची विवेकबुद्धीच होती. प्रत्येक गोष्टीची कसून तपासणी करून तिची परीक्षा घ्यायचा त्यांचा आग्रह असायचा. नीतिशास्त्र, नैतिकता, धर्म आणि आध्यात्मिक अनुभव यांचंही विश्लेषण करणं, त्यासंबंधी प्रयोग करणं, शोध लावणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं.
 राजकारणाचे अध्यात्मिकरण, एकादश व्रते, रचनात्मक कार्य आणि सत्याग्रह हे गांधीजींच्या जीवनशैलीचे सर्वात मोठे योगदान आहे.
बालपणीचे घरातील धार्मिक आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण, तरुणपणी रायचंदभाईंचा सहवास, गोपाळकृष्ण गोखल्यांचे मार्गदर्शन, गीतेचे चिंतन, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांचे विचार, कुराण, बायबल, थिऑसॉफिकल सोसायटीचे विचार आणि नित्य प्रयोगशीलतेची वृत्ती इ. बाबींमुळे त्यांचा आध्यात्मिक विकास होत गेला.
या सर्व बाबींचा आपण क्रमाक्रमाने विचार करणार आहोत.

राजकारणाचे आध्यात्मिकरण-
राजकारण व अध्यात्म यांनी एकमेकांपासून फटकून वागावे असे गांधीजी मानत नसत. यामुळेच गोखलेंद्वारा प्रतिपादित राजकारणाच्या अध्यात्मिकरणाच्या विचाराशी ते सहमत होते.
गांधीजीनी राजकारणाला छळ कपट व हिंसेपासून दूर नेऊन निस्वार्थ लोकसेवा व नैतिकतेचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला.
गांधीजी म्हणतात, "सध्या मी राजकारणात भाग घेतोय कारण वर्तमान काळात ही राजनीती सर्पाप्रमाणे चारही बाजूने वेढलेली आहे. हिच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरीही हा विळखा निघू शकत नाही. या सर्पाशी मला द्वंद्व युद्ध करायचे आहे.यामुळे मी राजनीती मध्ये धर्म आणू इच्छीतो."
जीवनाचा संपूर्ण उत्तरार्ध तर त्यांनी राजकारणाच्या अध्यात्मिकरणात खर्ची घातला. त्यांनी जीवनाचा समग्रतेने स्वीकार केला असल्यामुळेच तर ते अनेक साधु-संतांप्रमाणे राजकारणापासुन अलिप्त राहिले नाहीत. स्वराज्य प्राप्तीनंतर त्यांनी कुठल्याही राजकीय पदाचा स्वीकार केला नाही पण समकालीन सर्व राजकीय प्रश्नांमध्ये त्यांनी खुप रस घेतला आणि राजकारणाला मानवी मुल्यांवर अधिष्ठित करण्यासाठी अखंड धडपड केली. गांधीजींच्या अध्यात्मिक वृत्तीमुळे व 'बोले तैसा चाले' स्वभावामुळे अनेक नेते त्यांच्याकडे आकृष्ट झाले.
खरे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी कोणत्या राष्ट्रीय सद्गुणांची गरज आहे हे त्यांनी शिकवले.
देशाच्या नेत्यांसाठी त्यांनी काही विशिष्ट नियम वा साधना सांगितली.

एकादश व्रते -
येरवडे तुरुंगात असताना गांधीजींनी दर मंगळवारी सकाळच्या प्रार्थनेनंतर एक प्रवचन लिहून धाडण्याचा संकल्प केला. या संकल्पाचे प्रथम फळ म्हणजे आश्रमाच्या व्रतांचे त्यांनी केलेले विवेचन होय. ही 11 व्रते खालील सुत्रात वर्णित आहेत.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह ।
शरीर-श्रम, अस्वाद, सर्वत्र भय-वर्जन ॥
सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना।
हीं एकादश सेवावी नम्रत्वे व्रते -निश्चये ॥
1)     अहिंसा 2) सत्य 3) अस्तेय 4) ब्रम्हचर्य 5) असंग्रह 6) अंगमेहनत 7) अस्वाद 8) अभय 9) सर्वधर्मसमभाव 10) स्वदेशी 11) अस्पृश्यता निवारण
या 11 व्रतांचा अंगिकार प्रत्येक व्यक्तीने केल्यास त्याची आध्यात्मिक उन्नती होते.
ही एकादश व्रते गांधीजींची शक्तीस्रोतरूप होती. यात त्यांना नकारात्मक नव्हे तर सकारात्मक शक्ती दिसून आली.

हिंदू धर्मात आत्मसाक्षात्कारासाठी साधकाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रम्हचर्य या पाच महाव्रतांची शिफारस करण्यात आली आहे. याच पाच आधारस्तंभांवर गांधीजींच्या जीवनाची आणि तत्वज्ञानाची उभारणी झाली होती. परंतु या आदर्शांकडे बघायचा दृष्टीकोन परंपरागत नीतिवाद्याचा नव्हता तर एका वैज्ञानिक सत्यशोधकाचा होता.


अहिंसा-
गांधीजींच्या दृष्टीकोनातून अहिंसा केवळ एक तत्वज्ञान नव्हतं. ती एक कार्यपद्धती होती आणि हृदय परिवर्तनाचं ते साधन होतं.
एका शंकेखोर माणसाने गांधीजींना विचारलं," जगात जिकडे पाहावं तिकडे हिंसा आणि सत्तेच्या राजकारणाशिवाय दुसरं काही आढळत नाही. अशा परिस्थितीत तुमची अहिंसा काय करू शकते?" गांधीजींनी उत्तर दिलं, "माझी अहिंसा पांगळीही नाही आणि दुर्बलही नाही. ती सर्वशक्तिमान आहे. जिथं अहिंसा आहे तिथंच सत्य आहे आणि सत्यच ईश्वर आहे. जगात जिथं कुठं सत्याचं आणि अहिंसेचं साम्राज्य आहे तिथं शांती आणि आनंद आहे."
विरोधकाच्या भितीनंच आमच्यात द्वेषभावना निर्माण होते. परंतु अहिंसेच्या शब्दकोषात बाह्यशत्रुसारखा कोणताच शब्द नाही. जेव्हा हे कळतं तेव्हा भिती पळते. त्याचसोबत द्वेषभावनाही लोप पावते. अशा रितीनं विरोधकाच्या हृदय परिवर्तनात आपल्याही हृदय परिवर्तनाचा समावेश होतो.
"ज्याला वीरांच्या अहिंसेची साधना करायची असेल त्यानं सर्वप्रथम कमीतकमी आपल्या विचारांची भितीपासून मुक्तता करायला हवी आणि शुद्ध विचारांच्या लहानमोठ्या सर्व आचरणाचं नियमन केलं पाहिजे. अशा रितीनं अहिंसेच्या साधकानं न रागावता आपल्यापेक्षा सामर्थ्यसंपन्नांसमोर दबण्यास नकार द्यायला हवा."
"अहिंसेत.... सक्ती नावाची अशी काही गोष्ट नसते.... सत्याग्रही सेनापतीच्या शब्दात सामर्थ्य असलं पाहिजे... कारण विचार हे सर्व बोलांच्या व आचाराच्या मुळाशी असतात, दुसर्‍याचा दर्जा पहिल्याशी सुसंगत असतो. त्यामुळे पूर्णपणे नियंत्रित विचार हे स्वत:च अतिशय उच्च शक्तीचे द्योतक असतात व ते स्वत:च कार्यरत होऊ शकतात."

सत्य-
गांधीजी सत्याचे पुजारी होते. सत्य जीवनाच्या हरेक क्षेत्राला स्पर्श करते हे जाणून जीवनाला विविध कप्प्यांमध्ये बंदिस्त न मानता ते समग्रतेने पारखत.
ते म्हणत, "सत्य हेच ईश्वर आहे. ईश्वराची अनेक नावे आहेत. त्यापैकी एक नाव आहे सत्य. ते मला खूप आवडते."
सत्याचे पालन करताना त्यांना अनुभव आला की दुसर्‍यांना कमजोर बनवून, दुसर्‍यांची हिंसा करून किंवा कोणाला मारून सत्य मिळत नाही. म्हणून सत्यासोबत अहिंसेलाही त्यांनी आपला जीवन सिद्धांत बनविले.
"जिथं कुठं सत्य आहे तिथं ज्ञान (चित्) आहे. आणि जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे. ती अशी स्थिती असते की जिच्यात माणूस सुखदु:खाच्या पलीकडे जातो. म्हणून आपण ईश्वराला सत्, चित्, आनंद या स्वरूपात ओळखतो."
"सत्याचं दर्शन शुद्ध अनासक्त झालेल्या माणसालाच होऊ शकतं. क्रोध, लोभ, अहंकार, भय आदींमुळे साधकाच्या दृष्टीवर पडदा पडतो."
"सत्यसाधनेचा अर्थ आम्हाला दिसणार्‍या सत्याच्या संपूर्ण परिणामांसह अंत:करणापासून आणि समदृष्टीनं पालन करणं हा आहे. सत्याची दुसरी बाजू असलेल्या अहिंसेप्रमाणे तो केवळ एक तात्विक आदर्श नाही. तो एकांतात आचरायचा गुणही नाही. त्याला तर जीवनातूनच अभिव्यक्त करावं लागतं."
ज्या आदर्शांना गांधीजी मानत होते त्यांचं आपल्या जीवनात पूर्णपणे पालन करायचा गांधीजी सतत प्रयत्न करत होते. हीच त्यांची साधना होती. यामुळे त्यांच्या जीवनानं सत्यरूपी ईश्वराच्या मंदिरात निरंतर चालणार्‍या आराधनेचं स्वरूप धारण केलं होतं.

अस्तेय-
अस्तेय म्हणजे चोरी न करणे. याशिवाय कोणती एखादी वस्तु घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही असे असता ती ज्याच्या ताब्यात असेल त्याच्यापासून, त्याची परवानगी घेऊन का होईना, घेणे म्हणजे चोरी होय.
"सत्य आणि अपरिग्रहाच्या परस्पर प्रतिक्रियेतून अस्तेयाचा जन्म होतो. कारण स्तेय सत्य आणि अपरिग्रह दोघांना ही छेद देतो."
"आमच्या दैनंदिन गरजांसाठी निसर्ग भरपूर निर्माण करतो आणि प्रत्येक माणूस स्वत:साठी जेवढं हवं तेवढंच घेईल आणि त्यापेक्षा अधिक घेणार नाही तर या जगात गरीबी उरणार नाही आणि कोणी उपाशी मरणार नाही. तर्कशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर जो मनुष्य आपल्या डोक्यात व्यर्थ ज्ञान भरून ठेवतो तोही चोरी करतो आणि जो आपल्या वेळेचा एक क्षणही व्यर्थ दवडतो तोही चोरी करतो."

ब्रम्हचर्य-
ब्रह्मचर्याच्या आदर्शाचा गांधीजींनी तारुण्यातच स्वीकार केला होता. आणि तेव्हापासूनच ते त्याचं पालन करीत असत. ब्रह्मचर्याचा शब्दश: अर्थ आहे ब्रह्म म्हणजे सत्य आणि त्याच्या शोधाची चर्या म्हणजे त्यानुसार आचरण. ब्रम्हचर्याचा अर्थ आहे मन, वचन आणि सर्व कर्मेंद्रियांवर, वैशिष्ट्यानं जननेंद्रियावर एकाच वेळी नियंत्रण प्रस्थापित करणं.
खर्‍या ब्रह्मचर्याच्या वाणीत, विचारात आणि कार्यात कोणता तरी अद्भूत प्रभाव असतो. त्याची वाणी, त्याचे विचार आणि त्याची कृती या सर्वातून त्याच्या जीवनशक्तीची अभिव्यक्ती होत असते.
गांधीजींचं जीवन खर्‍या ब्रम्हचार्‍याचं जीवन होतं. त्यामुळे तरूण मुली आणि स्त्रिया कोणत्याही भितीशिवाय आणि न लाजता त्यांच्याजवळ यायच्या आणि त्यांना आपल्या मनातील अतिशय गुप्त गोष्टी सांगायच्या.
गांधीजी म्हणतात, " खरा ब्रम्हचारी माणूस सर्व जगातील कोणत्याही स्त्री-पुरुषांसाठी अनहिताचा विचार करू शकत नाही. असा माणूस क्रोध आणि मत्सरापासून मुक्त असतो आणि भगवद्गीतेच्या अर्थानं अनासक्त असतो. ब्रम्हचारी या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे ईश्वराच्या दिशेनं दररोज प्रगती करणारा आणि ज्याची प्रत्येक कृती केवळ त्याच ध्येयानं प्रेरीत होऊन केली जाते आणि अन्य कोणत्याही हेतूनं ती केली जात नाही असा माणूस."

अपरिग्रह-
अपरिग्रहाचा आदर्श सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांताचाच उपसिद्धांत आहे. आम्ही जर आमच्या शेजार्‍यावर स्वत:वर करावं तसंच प्रेम करत असू तर (इतरांना जेव्हा आवश्यक वस्तुही प्राप्त होत नाहीत तेव्हा) अनावश्यक वस्तूंचा ना आम्ही लोभ करू शकतो, ना त्यांचा संचय करू शकतो.
" जेव्हा मी राजकारणाच्या भोवर्‍यात सापडलो होतो तेव्हा मी स्वत:लाच विचारलं की अनैतिकता, असत्य आणि ज्याला राजकीय लाभ म्हणतात त्यापासून पूर्णपणे मुक्त राहण्यासाठी मी काय करायला हवं? ...... मी या निष्कर्षावर पोहोचलो की ज्यांच्यामध्ये मी राहतो त्या लोकांची सेवा मला करायची असेल तर मी सर्व प्रकारच्या संपत्तीचा, सर्व प्रकारच्या परिग्रहाचा त्याग करायला हवा.... एक वेळ अशी आली की ज्या वेळी या विषयांचा त्याग करणं माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा विषय होता."

अंगमेहनत- शरीरश्रम-
भगवद्गीतेच्या तिसर्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याखेरीज जो खातो तो चोरीचे अन्न खातो. गांधीजींच्या मतानुसार या ठिकाणी यज्ञ याचा अर्थ अंगमेहनत किंवा रोटी मेहनत हाच योग्य दिसतो. ज्याला अहिंसेचे पालन करावयाचे आहे, सत्याची आराधना करावयाची आहे, ब्रह्मचर्याला आपला जन्मस्वभाव बनवावयाचे आहे, त्याला तर अंगमेहनत ही रामबाणाप्रमाणे होते. प्रत्येकाने शेतीमध्ये अंगमेहनत केली पाहीजे. नाहीतर कातणे, विणणे, सुतारकाम, लोहारकाम इत्यादी. प्रत्येकाने आपापला भंगी तर झालेच पाहिजे. मलत्याग करणारानेच आपला मळ पुरून टाकावा ही उत्तम रीत होय.

अस्वाद-
अस्वाद म्हणजे खाण्यासाठी जगायचं नाही तर ईश्वरानं निर्मिलेल्या या जगाच्या सेवेसाठी जगता यावं म्हणून खायचं. स्वादेंद्रियाचं काम आहे स्वास्थ्यरक्षक आणि स्वास्थ्यभक्षक अन्नात विवेक करणं. जिव्हेचा संयम म्हणजे स्वाद नष्ट करणे असा नाही. परंतु स्वाद परिष्कृत आणि सुसंस्कृत करून जिव्हेचा सदुपयोग करणं आवश्यक आहे. सामान्यपणे जिव्हेला उपभोगाचं साधन बनवून आपण तिला अकार्यक्षम करतो आणि मृत्युला निमंत्रण देतो. जिव्हेचं दास्य पत्करून आपण इतर व्रतांचाही भंग करतो- वैशिष्ट्यानं ब्रह्मचर्याच्या.

अभय-
अहिंसा वा प्रेमाची खरी कसोटी निर्भयता आहे. संपूर्ण प्रेमानं सर्व भिती दूर होते.
जो माणूस घाबरतो आणि ज्याला निर्भय व्हायचं आहे त्यानं त्यासाठी शस्त्रास्त्रं ठेवणं बंद करून पहिलं पाऊल उचलायला पाहिजे. त्यानं परमेश्वरावर श्रद्धा ठेवायला हवी आणि आपल्या रक्षणासाठी त्याच्यावरच अवलंबून राहायला हवं.
अभय म्हणजे भौतिक शरीर आणि त्याच्याशी जुळलेल्या सर्व बाबींसंबंधी उदासीनता आणि त्याचा नाश झाला तरी तो सहन करण्याची तयारी. ज्याला परमेश्वराला शरण जायची इच्छा आहे त्याला शरीरापलीकडील आत्म्याच्या दर्शनाची ओढ व्हावी आणि असं ओझरतं जरी आत्मदर्शन झालं तर नाशवंत शरीरावरील प्रेम आपोआपच संपतं.
उपनिषदात म्हटले आहे- 'तेन त्यक्तेन भुंजीथा:' म्हणजे कुटुंब, पैसा, देह यांचे आपण रखवालदार म्हणून राहावे. तो ईश्वरच आपल्याला त्यांचे रक्षण करण्यापुरती शक्ति व सामग्री देईल. अशा तर्‍हेने धनीपणा सोडून चाकर बनलो, शून्यवत् होऊन गेलो, तर सहजच सर्व भये जिंकू, सहजच शांति प्राप्त करू.

सर्वधर्मसमभाव-
सर्व धर्म ईश्वरदत्तच आहेत, परंतु ते मनुष्यकल्पित असल्यामुळे, आपण मानतो तो धर्म अपूर्ण आहे, त्यामध्ये नित्य फेरफार होत असतात, आणि व्हायचेच. असे झाले तरच आपण उत्तरोत्तर चढू शकू. सत्याकडे, ईश्वराकडे रोजच्या रोज जवळ जात जाऊ. सर्व धर्म अपूर्ण मानल्यामुळे कोणत्याही धर्माला उच्च किंवा नीच लेखण्याचा प्रश्नच उरत नाही. सर्वधर्माविषयी समभाव बाणल्यामुळे आपले दिव्यचक्षु उघडतील. धर्मज्ञान जास्तीतजास्त होईल.
म्हणून आपल्या मनात सर्व धर्मांविषयी आदर असला पाहिजे.

स्वदेशी-
स्वदेशी हा आत्म्याचा धर्म आहे. आत्म्याच्या दृष्टीने स्वदेशीचा अंतिम अर्थ सर्व तर्‍हेच्या बाह्य संबंधांपासून संपूर्ण मुक्ति हाच होय. स्वदेशीधर्म जाणणारा व पाळणारा इसम जीवमात्राबरोबर ऐक्य साधण्यासाठी देहाचाही त्याग करील. म्हणजेच आपल्या जवळपास असलेल्या लोकांच्या सेवेमध्ये मग्न होऊन राहणे यातच स्वदेशी धर्म आहे. आहे. परंतु यामुळे परधर्माला हानी पोहोचू नये.
गांधीजींना खादीमध्ये सामाजिक शुद्ध स्वदेशीधर्म दिसून आला. म्हणून त्यांनी चरखा, खादी इ. चा खूप प्रचार केला.




अस्पृश्यता निवारण-
जातीभेदामुळे हिंदूधर्माचे नुकसानच झाले आहे असे गांधीजी म्हणत. त्यात गर्भित असलेली उच्चनीचतेची व स्पर्शास्पर्शाची भावना अहिंसाधर्माला विघातक आहे. अस्पृश्य मानल्या जाणार्‍या इसमांना इतर जातीच्या इसमांबरोबरच आश्रमामध्ये वागविण्यात येत होते.

सत्याग्रह विषयक विचार-
आपल्या जीवनात गांधीजींनी अनेक सत्याग्रहांना मार्गदर्शन केले. असे करत करत त्यांनी सत्याग्रह शास्त्राचा विकास केला. दरवेळेला त्यांचा सत्याग्रहाचा पवित्रा आगळा वेगळा असायचा. कधी विरोध प्रदर्शन तर कधी बहिष्कार कधी सविनय कायदेभंग तर कधी कर न देण्याची भुमिका.
स्वत:यातना भोगून म्हणजे अहिंसेच्या म्हणजेच प्रेमाच्या रसायनाद्वारे आपण त्याच्यात परिवर्तन घडवून आणू शकतो हे गांधीजींनी दाखवून दिलं. त्यांनी त्याला सत्याग्रह हे नाव दिलं. म्हणजेच आत्मक्लेष व प्रेम यांच्या बळावरच प्रतिपक्षावर विजय मिळविणे सत्याग्रहात अभिप्रेत आहे. सत्याग्रह म्हणजे 'आत्मशक्ती' वा सत्याची शक्ती. ही अशी शक्ती आहे की जिची प्राप्ती संपूर्ण विश्वाशी आणि त्याच्या माध्यमातून सर्वोच्च सत्याशी म्हणजे ईश्वराशी म्हणजेच सत्याशी जाणीवपूर्वक तादात्म्य पावल्यामुळे होते. याच परमेश्वराची अभिव्यक्ती मानवी संबंधातील प्रेमातून होत असते.
सत्याग्रहाचे नियम- सत्याग्रहाला नियंत्रित करणारे नियम भौतिक नियमांप्रमाणे जड नसतात तर सजीव असतात. आणि त्यांना वृद्धी, विकास आणि परिवर्तनाचे नियम लागू होतात.
कठोर आत्मसंयम, आत्मनिरीक्षण आणि सत्य तसंच अहिंसेच्या दृष्टीनं सतत सदाचरण करणं हे गुण सत्याग्रहीच्या अंगी असतात. सत्यपालनात विरोधकाच्या हिंसेला कोणतंच स्थान नाही.
सत्याग्रहीची प्रयोगशाळा त्याचा आत्मा किंवा अंतरात्मा हीच असते. सत्याग्रहाचा प्रयोग करणारा आपल्या संशोधनात ज्या साधनांचा उपयोग करतो त्या व्रतांचं(सत्य, अहिंसा इ. पंच महाव्रते ) वा नियमांचं तो वैज्ञानिकांच्या निष्ठेनं आणि शिस्तीनं पालन करतो.
सत्याग्रहाच्या शक्तीमुळे गांधीजींना पूर्ण जगानं महात्मा ठरवलं. ज्या साम्राज्यानं दोन महायुद्धात आपल्या विरोधक सैनिकी शक्तींना पराभूत केलं होतं त्याच साम्राज्याला या नि:शस्त्र योद्ध्याशी तडजोड करावी लागली होती.

विश्वस्तवृत्ती- अहिंसक संस्कृतीमध्ये खाजगी संपत्तीला महत्व नसते. सर्व काही ईश्वराचे आहे. आपण फक्त या संपत्तीचे विश्वस्त आहोत असे मानले पाहिजे.
समाजातले जे मुठभर धनवान लोक आहेत त्यांनी अर्जित केलेल्या संपत्तीचे स्वत:ला मालक न समजता विश्वस्त समजावे व स्वेच्छेने त्याचा उपयोग गरिबांच्या भल्याकरिता करावा. यामुळेच सर्वोदय समाजाची निर्मिती होते.

सर्वोदय-
 देशाच्या प्रगतीची सुरूवात गरिबांपासून झाली पाहिजे. गरिबांना पोटभर अन्न मिळावे, दुध तुप मिळावे, घालायला कपडे मिळावेत, राहण्यासाठी स्वच्छ घरे मिळावीत, त्यांच्या मुलांना खरे शिक्षण मिळावे आणि कोणी बेकार राहू नये, असे झाले पाहिजे. यालाच गांधीजींनी सर्वोदय म्हटले आहे.
आध्यात्मिक कोडे उकलण्यासाठी सुद्धा त्यांनी एक ताईत दिला होता की जीवनात बघितलेल्या कुठल्याही दीनदरिद्री माणसाचा चेहरा नजरेसमोर आणा आणि स्वत:ला विचारा की आपला उपक्रम दरिद्री नारायणाला उपकारक ठरणार आहे का? याचे उत्तर सकारात्मक असेल तर आपल्या कार्याची दिशा उचित. 
ते म्हणत की माझ्या तपस्येचा हिमालय तेथेच आहे जेथे अजून दारिद्र्य आहे. मला ते नष्ट करायचे आहे, शोषण दूर करायचे आहे, दु:ख निवारायचे आहे. देशातील एखादासुद्धा मनुष्य जोपर्यंत जीवनाच्या गरजांपासून वंचित आहे तोपर्यंत मला शांति लाभणार नाही.


मोक्ष-
गांधीजींच्या मते मोक्ष म्हणजे क्रमाक्रमाने स्वत:च्या दोषांमधून मुक्त होणे.
"शुद्ध सत्याच्या दृष्टीनं आमचं शरीरही आत्म्याचा केलेला अपरिग्रहच आहे. भोगेच्छेमुळे आम्ही शरीराचं आवरण उभं केलं आहे आणि त्याला आपण टिकवून ठेवत आहोत. जेव्हा ही भोगेच्छा संपते तेव्हा शरीराची गरज उरत नाही आणि माणूस जीवन मरणाच्या दुष्ट चक्रातून मुक्त होतो."


पुनर्जन्म-
गांधीजी म्हणतात," माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या जन्मी जे करता आलं नाही ते पुढील जन्मी करता येऊ शकेल. परंतु त्याचबरोबर माझा असाही विश्वास आहे की या जन्मातच माणसानं यथाशक्ती सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजे. आळसासाठी पुनर्जन्माच्या तत्वज्ञानाचं निमित्त करणं ही त्या तत्वज्ञानाची आणि स्वत:ची फसगत होईल."




रायचंदभाई व गांधीजी-



ज्या रात्री गांधीजींना आईच्या मृत्युची बातमी समजली त्यावेळी त्यांना दिलासा व आध्यात्मिक मार्गदर्शनाची आवश्यकता होती. याच दिवशी त्यांची रायचंदभाईची भेट झाली. रायचंदभाई हिर्‍यामोत्यांचे व्यापारी होते तरीही त्यांच्या चारित्र्यातील शुद्धता, स्वयंशिस्त, समतोलपणा आणि आध्यात्मिक परिपूर्णता मिळवण्यासाठी त्यांच्या अंत:करणाची चाललेली धडपड या त्यांच्या गुणांनी गांधीजी प्रभावित झाले.
भारतातील दोन वर्षांच्या मुक्कामात त्यांनी राजचंद्रांच्या जीवनाकडे जवळून बारकाईनं पाहिलं. परंतु त्यांच्यात गांधीजींना आसक्तीचा लवलेशही सापडला नाही. उलट श्रेष्ठ प्रतीच्या विरक्तीचं दर्शन झालं होतं. त्यांच्या प्रत्येक कृतीवर समतोलपणा, प्रतिष्ठितता आणि कळकळ यांचा ठसा उमटलेला असायचा. आपल्या सर्व बाह्य कृतींना ते स्वयंशिस्तीचं आणि मुक्तीच्या अंतिम ध्येयाचं साधन समजायचे. त्यांनी दाखवून दिलं की अध्यात्म आणि यशस्वी व्यापार हे हातात हात घालून चालू शकतात. ते नेहमी आपल्याजवळ धार्मिक वा तत्वज्ञानाचं पुस्तक जवळ ठेवायचे. अनेकांना ते आध्यात्मिक मार्गदर्शनही करत. गांधीजींना त्यांनी गीता वाचायचा सल्ला दिला.
श्रीमद राजचंद्र यांच्याबद्दल गांधीजींना अतिशय आदर होता. त्यांच्या शिकवणुकीचं व मार्गदर्शनाचं गांधीजींवर ऋण होतं.
आत्मा आणि ईश्वर, मोक्ष वा मुक्ती, राम आणि कृष्ण यांचं देवत्व वा केवळ त्यांच्या ईश्वरी अवतारावर विश्वास ठेवल्यामुळे मोक्ष मिळू शकतो काय, अवतार आणि प्रेषितामागील तत्वज्ञान, वेदांचं प्राचीनत्व आणि त्यांची अधिकृतता, त्यांना प्रत्यक्ष ईश्वरी शब्द मानता येते काय आणि मग तसं असल्यास बायबल व कुराणाला तसं का मानण्यात येऊ नये अशा प्रकारचे अनेक प्रश्न गांधीजींनी राजचंद्रांना पत्रांमधून विचारले होते.
त्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. त्यातील काही निवडक उत्तरे-

ईश्वर कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त झालेला आत्मा आहे. ईश्वर त्याच्या मुळ स्वरूपात शुद्ध चैतन्य आहे, परिपूर्ण बुद्धी आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे. शुद्ध स्वरूपातील आत्म्यापेक्षा अधिक शक्तिशाली असं कोणतंच आदिकारण नाही वा आत्म्याच्या बाहेर त्याचं अस्तित्व नाही.
आत्मा आणि विश्व हे दोन्ही अनंत आहेत. माझ्या विवेकबुद्धीला सर्व आत्म्यांचा लोप होईल वा सर्व आत्म्यांना कायमची मुक्ती मिळेल असं दिसत नाही तसंच संपूर्ण विश्वाचं विसर्जन होईल असंही वाटत नाही. विश्व आणि आत्मा हे दोघंही चिरंतन प्रवाहासारखे आहेत आणि राहतील.
द्वेष आणि मोह, हाव आणि कामवासना इ. वासना आत्म्याला शरीराशी बांधून ठेवतात व त्या या बंधनासाठी कारणीभूत असतात. मुक्ती वा मोक्ष म्हणजे यापासून संपूर्ण मुक्ती.
वेदांचं प्राचीनत्व नाकारता येत नाही. बुद्ध आणि महावीराच्या आधीही वेद होते. परंतू प्राचीनत्व म्हणजे परिपूर्णत्व नाही. त्यानंतरचं प्रगटीकरण अधिक परिपूर्ण असू शकेल. सर्व प्रकारचे विचार आधीपासून अस्तित्वात होते व शेवटपर्यंत अस्तित्वात राहतील परंतु त्यांची अभिव्यक्ती वा बाह्याकार बदलत असतो.
राम आणि कृष्ण यांच्या देवत्वावर विश्वास ठेवल्यामुळे जर कुणाची वासनांपासून मुक्त होऊ शकत असेल तर असं म्हणता येईल की त्या प्रकरणी मोक्ष हा त्या श्रद्धेचा परिणाम आहे.
भारतातील प्राचीन ऋषीमुनींनी आश्चर्यजनक अध्यात्मविषयक जे शोध लावले आहेत त्या आत्म्यासंबंधीच्या प्रश्नांसंबंधी जी सखोल दृष्टी दाखवली तशी दृष्टी कोणत्याही धर्मानं दाखवली नाही.
आमच्या या दैनंदिन काम भागवू इच्छिणार्‍या जगात आपला स्वत:चा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारायची काहीच गरज नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या पालनानं मुक्ती मिळू शकते. कारण मुक्ती म्हणजे मोह आणि द्वेषापासून पूर्णपणे सुटका. आणि सर्व धर्मांचं हेच सामान्य ध्येय आहे.
खरा धर्म कसा ओळखावा आणि सर्व खोटे धर्म बाजुला कसे सारावे या गांधीजींसमोरील लहाणपणापासून त्रस्त करणार्‍या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायला श्रीमद राजचंद्रांनी गांधीजींना मदत केली. त्याचा सारांश थोडक्यात असा:
धर्म हा एखादा 'वाद' नाही. एखाद्या विशिष्ट विचारसरणीचं ते केवळ बौद्धिक ज्ञानही नाही आणि किंवा त्या विचारसरणीवरील श्रद्धाही नाही. तो आत्म्याचा अंतर्गत गुण आहे. त्यामुळे माणसाला माणूस म्हणून आपलं जीवनकर्तव्य काय आहे याचं आणि आपल्या बांधवांशी योग्य संबंध कसे प्रस्थापित करावे याचं ज्ञान होते. परंतु त्याआधी आपल्याला आपल्या स्वभावधर्माचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळं धर्म म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं साधन आहे.

जोपर्यंत श्रीमद राजचंद्र जिवंत होते तोपर्यंत ते गांधीजींना आत्म्याच्या यात्रेत मार्गदर्शन करत होते. शिष्यानं गुरूची सर्वच शिकवण मान्य केली नाही व कदाचित त्यातील कोणतीही पुर्णपणे मान्य केली नसावी. परंतु त्यांची भेट व्हायच्या आधी होकायंत्र नसलेल्या व दिशाभान न राहिलेल्या एखाद्या नावाड्याची जशी अवस्था असावी तशी गांधीजींची अवस्था होती. त्यांची भेट झाल्यानंतर गांधीजींची तशी अवस्था राहिली नव्हती. आणि अखेरीस तर शिष्य आपल्या गुरूच्या शिकवणूकीच्याही पुढे निघून गेला.

रामकृष्ण परमहंस, विवेकानंद आणि गांधीजी-


तीव्र, गुढ विचारांची सर्वशक्तिमानता, जाणवलेल्या सत्याचा कार्यप्रवृत्त व्हायचा स्वभाव, शब्द वा कृती यांच्या माध्यमाशिवायही जिवंत श्रद्धेचा आपला विचार वा भावना कळवण्याचं सामर्थ्य, आणि सर्वोच्चाचा अनुभव येण्यासाठी सर्व प्रकारच्या मार्गाची वैधता या सर्व गोष्टींची घोषणा करून श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या समकालीन जगाला विचार आणि कृतीचा नवीन मार्ग दाखवला. गांधीजींनीही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयोगांतून, उभारलेल्या अहिंसक संघटनेतून आणि सत्याग्रहासाठी केलेल्या वेगवेगळ्या कृती त्याचा प्रत्यय आपल्याला येतो.
विवेकानंद ज्याला 'अध्यात्माचं विज्ञान' म्हणतात त्याचा पाया रामकृष्णांनी घातला. ते म्हणाले 'आधी पडताळा घ्या आणि नंतर विश्वास ठेवा, धार्मिक अनुभवानंतर विश्वास येतो आधी नाही'. धर्मातील त्यांचे प्रयोग गांधीजींच्या 'सत्याच्या प्रयोगा'चे पूर्ववर्ती ठरले.
सर्व धर्मातील सत्यतेसंबंधीच्या त्यांच्या सिद्धांतांचा प्रतिध्वनी गांधीजींच्या सर्वधर्मसमभावातून उमटताना आढळतो.
ब्रह्मज्ञानासंबंधीच्या वादविवादांना विद्वानांचा रिकामपणाचा विरंगुळा म्हणून त्यांनी ज्याप्रमाणे नापसंती दाखवली होती त्याचप्रमाणे गांधीजींनीही सर्व प्रकारच्या धर्मांतराच्या कृत्यांना ईश्वरविरोधी म्हणून नापसंती दर्शवली होती.
रामकृष्ण, विवेकानंद आणि गांधीजी यांच्या अनुभवातील आणि वचनातील हे विलक्षण साम्य पाहिलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहू शकत नाही. परंतु थोडा विचार केला असता यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण ते सर्व अनंताचे सहयात्रेकरू होते. आत्म्याच्या शोधार्थ त्यांनी जो आध्यात्मिक प्रवास केला तो सारखाच असल्यामुळे त्या प्रवासाच्या दरम्यान आढळलेल्या पाऊलखुणाही सारख्याच असणं अपरिहार्य होतं.


थिऑसॉफिकल सोसायटी व गांधीजी-
1875 साली मॅडम ब्लावात्स्की व कॉलनल अल्कॉट यांनी अमेरिकेत थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. थिऑसॉफी या शब्दाचा अर्थ ब्रम्हविद्या वा अमूर्ताचं ज्ञान असा होतो. थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्य शिकवणुकीत 'वेदांतातील अमूर्ताच्या संकल्पनेशी जुळणार्‍या सर्व प्रमुख देवांतील एकात्मता; आत्म्याचं अमरत्व आणि विश्वबंधुत्व' यांचा अंतर्भाव आहे. जगाला संप्रदायाची गरज नाही. विश्वात केवळ एकच सत्य असल्यामुळे माणसाला एकाच चर्चची गरज आहे- आपल्या आतील ईश्वराच्या चर्चची.
माणसाच्या विश्वबंधुत्वाशिवाय थिऑसॉफिकल सोसायटी कर्मसिद्धांत, अवतार आणि पुनर्जन्माच्या तत्वांनाही मान्यता देते. थिऑसॉफिकल सोसायटी भारतीय स्वातंत्र्य संघर्षाशी एकरूप झाली होती व तिने स्वातंत्र्य आंदोलनाला पश्चिमेतून अनेकांची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवून दिला.  
थिऑसॉफीमधील विश्वबंधूत्वाची भावना गांधीजींना आवडली. परंतु त्यातील गुढ आणि गुप्ततेचा भाग काही त्यांना रूचला नाही आणि नंतरच्या वर्षात त्यांच्या काही विचारांबद्धल, वैशिष्ट्यानं आत्म्याशी संवाद साधायचा ते जो दावा करायचे त्याबद्धल गांधीजींनी तीव्र नापसंती व्यक्त केली. थिऑसॉफीस्ट बंधूंनी भगवद्गीतेचा एडविन अर्नोल्ड यांनी केलेला अनुवाद, द भगवद्गीता- सॉंग सेलेस्टियल त्यांना वाचायला दिला. त्यामुळे मला जीवनाचा नवीन दृष्टीकोन मिळाला. त्यानं माझ्या आत्म्याला स्पर्श केला असे गांधीजी म्हणाले. 
गांधीजी आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांच्यात धार्मिक आणि तात्विक विचारांच्या बाबतीत जे साम्य होतं त्यामुळे गांधीजींना विद्यार्थीदशेत इंग्लंडमध्ये अनेक इंग्रजी मित्र आणि दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह संघर्षात अत्यंत विश्वासू असे अनेक सहकारी मिळाले.

हिंदू धर्म, गीता व गांधीजी-
लंडनला जाईपर्यंत हिंदूधर्माशी असलेला त्यांचा परिचय मामुलीच होता. ज्यावेळी हिंदू धर्माची ओळख करून देण्यासाठी गांधीजींना कुणाचंच मार्गदर्शन नव्हतं त्यावेळी मेटलॅंड च्या पुस्तकामुळे हिंदूधर्मातील अनेक मूलभूत बाबींसंबंधी उदाहरणार्थ पुनर्जन्म, आत्म्याची देहान्तरप्राप्ती अथवा परकायाप्रवेश, ईश्वर आणि व्यक्तीचा आत्मा यातील अद्वैत आणि ईश्वराच्या ज्ञानानं पापक्षालन झाल्यानंतरही परत अध:पतन व्हायची शक्यता यासंबंधी विवेकाला पटणारी उत्तरं गांधीजींना मिळाली.
गांधीजी भगवद्गीतेला कृतीचा शब्दकोष म्हणायचे. गीतेच्या दुसर्‍या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाच्या ज्या लक्षणांचं वर्णन करण्यात आलं आहे त्यानं गांधीजींच्या मनावर खोल परिणाम झाला. भगवद्गीतेतील अपरिग्रह व समभाव म्हणजे सुख-दु:ख समान मानण्याचा आणि कर्मफलाची चिंता न करता कर्म करीत राहण्याचा सिद्धांत गांधीजींनी आपला जीवनसिद्धांत म्हणून स्विकारला.
महात्मा गांधींनी 'वैष्णवजन' चा आदर्श आपल्यासमोर ठेवला. गीतेमध्ये आदर्श पुरूषाचे असलेले 'स्थितप्रज्ञ', 'गुणातीत', 'ज्ञानी', 'पंडित', 'बुध' इ. पर्याय वैष्णवजनासाठी लागू असावेत असे म्हटले आहे. वैष्णवजनाच्या अंगी समत्वदृष्टी असावी. समत्वदृष्टी ही मानसिक त्याचप्रमाणे सामाजिकही असावी असे गांधीजी म्हणत. वैष्णवजन संकल्पनेतूनच पुढे सर्वोदयाचा विचार त्यांनी मांडला. त्यातूनच अन्याय व अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रभावशाली तरीही सात्विक 'सत्याग्रह' पद्धतीचा उदय झाला. आणि मानवाच्या विकासासाठी संघर्ष टाळून समन्वय साधण्याची कला ते विकसित करू शकले.
सर्व प्रचलित धर्म व संप्रदाय यांचा अभ्यास केल्यानंतर अखेर गांधीजी या निर्णयाप्रत आले की "माझ्या बाबतीत मोक्ष हा केवळ हिंदू धर्माद्वारेच शक्य आहे आणि तेव्हापासून माझी हिंदू धर्मावरील श्रद्धा अधिक खोल व अधिक डोळस बनली." परंतु हिंदू धर्मातील उणिवा त्यांना स्पष्ट दिसत होत्या. अस्पृश्यता हे जर हिंदू धर्माचे अंग असेल तर ते सडलेले व फाजील वाढलेले अंग आहे असे त्यांना वाटले.
परमेश्वराच्या सर्वश्रेष्ठत्वावर, सर्व प्राणिमात्रांच्या एकतेवर आणि ईश्वरप्राप्तीचे साधन म्हणून प्रेम व अहिंसा या तत्वावर श्रद्धा हा गांधींच्या हिंदू धर्माचा मूलाधार होय.  

जैन धर्म व गांधीजी-
जैन तत्वज्ञानातील तीन गोष्टींनी गांधीजींच्या दृष्टीकोनाला जास्त प्रभावित केलं. धार्मिक दृष्टीनं त्यात अहिंसेचा समावेश होता तर तात्विक दृष्टीनं अनेकत्ववाद वा स्याद्वादाचा(शक्यतेच्या सिद्धांताचा) आणि नैतिक दृष्टीनं शपथेचा.
जैन धर्मानुसार अहिंसा हा नकारात्मक गुण नाही- केवळ हिंसेपासून यांत्रिकपणे दूर राहणे म्हणजे अहिंसा नाही तर सर्व जीव एक आहेत हे जाणून घेऊन सर्व जीवमात्राबद्धल बंधुत्वाची भावना हा अहिंसेचा सकारात्मक अर्थ आहे. तात्विक बाजूनं जैन विचारवंतांनी अनेकत्ववादाचा म्हणजे विविधांगी सत्याचा पुरस्कार केला आहे. गांधीजींच्या जीवनावर जैन संस्थांमधील मूलभूत परिणाम करणारी तिसरी संस्था म्हणजे शपथेची संस्था आणि वैशिष्ट्यानं रसनेवर विजय मिळवण्यावर दिलेला भर. जन्ममृत्युच्या चक्रातून सुटून मोक्ष वा मुक्ती मिळवणं हे जीवनाचं सार आहे व समग्र रुपानं तसंच सुक्ष्म रूपानं कर्म आत्म्याला प्रकृतीशी बांधते. त्यामुळे जैन शास्त्र सांगतात की माणसानं दैनंदिन जीवनात अशा रीतीनं कर्म करावं की कर्माची वाईट फळं कार्यरतच होऊ नयेत. यासाठी काही नियम वा शपथा सांगण्यात आल्या आहेत. त्यांनाच अनुव्रत म्हणतात. ते नियम व्रत आहेत- अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह. रसनेवरील नियंत्रण हे स्वत:वरील नियंत्रणाचं पहिलं पाऊल आहे व तेच त्याचं फळही आहे.  

 ख्रिस्त धर्म व गांधीजी-
येशुचा अद्भूत जन्म, त्याला सुळावर चढवणं आणि त्याचं पुनरुत्थान या गोष्टी एका विशिष्ट व्यक्तीच्या बाह्य जीवनात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना नाहीत तर तुमच्या आणि माझ्या मनातीलच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या अंत:संघर्षाचा तो इतिहास आहे असे गांधीजी मानत. तसेच येशु हा एक तत्व होता, एक प्रक्रिया होता आणि जडाचं चेतनात घडवून आणणारी एक व्यवस्था होता.
मिताहार, प्रार्थना, ध्यान, जागृती, आत्मसंयम, निर्भयता, आणि स्वैच्छिक दारिद्र्य यांनी शपथबद्ध असलेल्या माणसानं शरीरावर संपूर्ण विजय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहायला पाहिजे. त्यानंतर त्याची सर्व शपथांमधून सुटका होते. त्यानं सर्व कसोटया पार पाडलेल्या असतात व त्यानं त्याच्या इच्छेला मुक्त केलेलं असतं.... त्याची जडापासून मुक्ती झालेली असते आणि त्याला या भौतिक शरीरात कधीही राहायची वेळ येत नाही.
या सर्व गोष्टींनी गांधीजींच्या आदर्शवादाला अतिशय प्रभावित केलं असावं.

इस्लाम धर्म व गांधीजी-
इस्लामच्या प्रकाश दाखवायच्या प्रयत्नांचं गांधीजींनी सत्यशोधक म्हणून स्वागत केलं.
त्यांनी कुराण व इस्लामवरील अनेक पुस्तकांचा श्रद्धापूर्वक अभ्यास केला.

ईश्वर आणि प्रार्थना-
सर्वांच्या ठायी वसणार्‍या ईश्वरतत्वाबाबत ते ठाम होते. ईश्वर जर सत्कर्म आचरणारा आणि कल्याणमय असेल तर मग प्रत्येकाच्या ठायी काही-ना-काही भलेपणा वा चांगुलपणा असायलाच हवा आणि जगत्कर्ता ईश्वर कल्याणमय असल्यामुळे अखेरीस जगताला कल्याणमार्गाला लावेल. या दोन श्रद्धांनी गांधीजींचे जीवनदर्शन साकारले होते.
सर्वव्यापी कालातीत निर्विकार तत्वाचं शांतपणानं केलेलं चिंतन म्हणजे प्रार्थना असे ते म्हणत.
"ईश्वरी ईच्छा अपरिवर्तनीय असते. परंतु हा ईश्वरी अंश प्रत्येकात असल्यामुळे प्रार्थनेचा अर्थ आमच्यातील ईश्वरीय तत्व जागृत करणं असाही असतो."
नास्तिक लोक ईश्वराचं अस्तित्व नाकारतात परंतु सत्य नाकारत नाहीत. त्यामुळे गांधीजी या निर्णयावर पोहोचले की 'ईश्वर सत्य आहे असं म्हणण्याऐवजी सत्य ईश्वर आहे असं मी म्हणायला पाहिजे.
"एक माणूस ईश्वराला एक व्यक्ती मानून त्याची पूजा करू शकतो, दुसरा शक्ती मानून आणि तिसरा सत्य अथवा नियम मानून त्याची पूजा करू शकतो. परंतु यामुळे काहीच फरक पडत नाही. एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे की या शक्तीमध्ये शेवटी ईश्वर हीच परम शक्ती आहे. अन्य सर्व शक्ती भौतिक आहेत. परंतु ईश्वरच या शक्तीमधील चैतन्य शक्ती वा या शक्तींचा आत्मा आहे. तो सर्वव्यापी आहे आणि म्हणूनच मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे."
"ईश्वराला मी व्यक्ती मानत नाही. माझ्यासाठी सत्यच ईश्वर आहे आणि या जगात राजा आणि त्याचे कायदे जसे वेगवेगळे असतात त्याप्रमाणे ईश्वरी नियम आणि ईश्वर यांना मी वेगवेगळं समजत नाही. ईश्वर एक कल्पना आहे, एक विचार आहे आणि स्वत:च एक नियम आहे... त्यामुळे तो नियम मोडतो ही कल्पना करता येऊ शकत नाही."
"माझ्यासाठी ईश्वर सत्य आणि प्रेम आहे. ईश्वर नीती आणि सदाचार आहे. ईश्वर निर्भयता आहे. ईश्वर प्रकाश आणि जीवनाचा स्रोत आहे. आणि तरीही तो सर्वांच्या वर आहे. ईश्वर सदसद्विवेकबुद्धी आहे. ईश्वर नास्तिकांचा नास्तिकवादही आहे.. तो वाणी आणि बुद्धीच्या पलीकडील आहे. ज्यांना मूर्त स्वरूपात त्याची आवश्यकता असते त्याच्यासाठी तो साकारही आहे. ज्यांना त्याचा स्पर्श हवा असतो त्यांच्यासाठी तो शरीरधारीही असतो. अतिशय शुद्ध सत्व म्हणजे तो ईश्वरच."     
"प्रार्थना हृदयाचा एक शोध आहे... मानवतेला घातलेली ती साद आहे... आत्मशुद्धीसाठी केलेली ती धडपड आहे."
"ध्यान म्हणजे आपल्या भक्तीचा विषय सोडून इतर सर्व वस्तूंपासून मनाचे डोळे आणि कान बंद करणं." त्यामुळे गांधीजी म्हणत असत की यामुळेच प्रार्थना करताना माणूस आपल्याच श्रेष्ठ स्वरूपाची ईश्वरीय तत्वाची, अंतर्यामी सत्याची आणि सर्व प्राण्यात वसलेल्या सत्याची पूजा करत असतो असं म्हणता येईल.
गांधीजी एकदा म्हणाले होते," राजकीय क्षितीजावर माझ्यासमोर निराशाच निराशा पसरलेली असतानाही माझी शांतता कधीच भंग होत नाही... ती शांतता ... प्रार्थनेतून मिळते."
 प्रार्थनेचं विज्ञान व्यवहारात आणून व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो काय ते त्यांना पाहायचं होतं. त्यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थनेच्या तंत्राचा उपयोग केला. गांधीजी म्हणाले, "सामुदायिक प्रार्थना सामान्य उपासनेद्वारे मूलभूत मानवी ऐक्य निर्माण करायचं साधन आहे." ही प्रार्थना त्यांच्या अहिंसक सामूहिक कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग झाली.
नौखाली मध्ये हिंदू-मुस्लीम दंगल झाली असताना मनोधैर्य खचलेल्या लोकांमध्ये नवीन जीवनाधार निर्माण करण्यासाठी, धर्मांधता, धार्मिक कट्टरपणा यांच्या विषावर उतार शोधण्यासाठी गांधीजींनी सर्वधर्मसमावेशक अशा सामुदायिक सार्वजनिक प्रार्थनेचा वापर केला.
नौखालीमध्ये एकदा सभेत मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले," माणसाचं सर्व सामर्थ्य क्षणभंगूर आहे. ईश्वरावर जेव्हा आपण सर्व भार टाकतो तेव्हाच खरी सुरक्षितता आपल्याला प्राप्त होते.
तुझ्या छ्त्रछायेखाली
राहिले सुरक्षित संत
पुरेसं आहे तुझं बाहुबल
निश्चिंत राहू सुरक्षित सदैव
नौखालीत आज आम्हा सर्वांना हाच पाठ शिकण्याची अत्यंत आवश्यकता आहे."




रामनाम-
गांधीजींनी ब्रम्हचर्याचे वर्णन करताना सांगितले की ब्रम्हचर्य अंगी बाणवण्याचा सरळ मार्ग रामनाम आहे. रामनाम असं रसायन आहे की ज्यामुळे शरीरात परिवर्तन होऊ शकतं. वीर्याचा केवळ संग्रह करणं हे धन गोळा करून ठेवण्यासारखं आहे. केवळ रामनामामुळेच त्यातून अमोघ शक्ती निर्माण होऊ शकते आणि तिचं आध्यात्मिक शक्तीत परिवर्तन होऊ शकते. आणि मग अशा माणसाचं पतन अशक्य होतं. रामनाम हे आपलं साधन आणि सत्य हे साध्य असणं आवश्यक आहे.
त्यांनी निसर्गोपचाराचा पुरस्कार करताना याही पुढे जाऊन रामनामावर श्रद्धा असेल तर कोणत्याही डॉक्टरची किंवा कोणत्याही मदतीची गरज नसते हे स्पष्ट केले आहे. 

विनोबा व गांधीजी-


विनोबा सर्वप्रथम गांधीजींना भेटले तेव्हा गांधीजींच्या जवळ मला हिमालयाची शांतिहि मिळाली आणि बंगालची क्रांतिही सापडली असे ते म्हणाले. देशाचे राजकीय स्वातंत्र्य व आध्यात्मिक विकास दोन्ही बरोबरच साधू पाहणारा हा पुरुष आहे असे त्यांना वाटले.
विनोबाजी म्हणतात," नेहमी स्वत:ला अपूर्ण मानणार्‍या बापूंचेच अपूर्व आकर्षण मला राहिले. मी त्यांच्यावर मुग्ध झालो ते त्यांच्या अंतर् बाह्य एकतेच्या स्थितीमुळे. शिवाय कर्मयोगाची दीक्षा मला बापूंकडून मिळाली. बापूंसारखा शरीरधारी स्थितप्रज्ञ भाग्यानेच शोधून सापडेल.
ते पुढे म्हणतात," गांधीजींचे चरित्र महापुरूषांच्या चरित्रासारखे आहे, त्यांच्या कार्याचा पाया अध्यात्म आहे. तसेच गांधीजींनी पहिल्याप्रथमच भक्ति- मार्गाच्या स्वरूपात समाजसेवा सुरू केली."
बापू म्हणत की आपण आपल्या संतोषासाठी काम करीत असतो. बाकी परिणामाच्या दृष्टीने सर्व क्रियांचा परिणाम शून्य आहे. या शून्यातच बापूंची आध्यात्मिक बैठक होती.
विनोबा म्हणतात," राजकीय, सामाजिक वगैरे समस्यांच्या उकलीसाठी बापूंनी आत्मशक्तीचा उपयोग करून दाखवला. व्यक्तीगत जीवनात आत्मबल यशस्वी होते हे समाजाने पाहिलेच आहे, परंतु सामाजिक क्षेत्रात व्यापक प्रमाणात त्या शक्तीचा उपयोग करता येतो हे गांधीजींनी दाखवले."  
गांधीजींच्या मनात अनेक आध्यात्मिक शंका होत्या, आणि जोपर्यंत त्या शंकांचे निवारण झाले नव्हते, तसेच जोपर्यंत त्यांना काही गुढ अनुभव आले नव्हते तोपर्यंत ते कामाला लागले नव्हते.
एक दिवस विनोबांनी गांधीजींना ईश्वराविषयींच्या अनुभवाबद्धल विचारले.
विनोबा म्हणाले- "तुम्ही सत्य हेच परमेश्वर आहे असे म्हणता ते ठीक आहे; पण उपवासाच्या दिवशी तुम्ही म्हणाला होता की 'मला आतला आवाज ऐकू आला.' ते काय आहे? त्यात काही रहस्य- गुढता- आहे?"
गांधीजींनी उत्तर दिले- "होय, त्यात काही असा आहे खरे! ही अगदी साधारण बाब नाही. मला आवाज स्पष्ट ऐकू आला. मी विचारले, मी काय करावे? तेव्हा उत्तर आले, 'उपवास करायला पाहिजे.' मी पुन्हा विचारले की 'किती उपवास करायला पाहिजेत?' तर उत्तर आले, 'एकवीस दिवस."
येथे साक्षात ईश्वर गांधीजींशी बोलला. यानंतर बापूंनी स्विकारले की जर ईश्वराचा आवाज ऐकू येणे शक्य असेल, तर त्याचे दर्शनही होऊच शकेल. कोणाला श्रवणाची अनुभूति होईल तर कोणाला दर्शनाची.
ईश्वराचे अस्तित्व त्यांनी अशा रितीने अनुभवले. आपल्या सर्वांना अध्यात्माचा ध्यास लागावा अशीही त्यांची इच्छा होती. साध्या सरळ भाषेत सांगायचे तर रामनामाचा छंद सर्वांना लागावा असे ते म्हणत.





प्रकल्प सारांश

गांधीजी म्हणाले होते की आपण सर्व अपूर्ण माणसं असल्यामुळे सर्वोच्च प्राप्तीच्या
आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आपण आपल्याहून कमी अपूर्ण असलेल्या लोकांची मदत घेतो. ते जगद् गुरु वा धर्मसंस्थापक आहेत. परंतु आपल्या आध्यात्मिक प्रवासात अपरिहार्यपणे अशी एक वेळ येते की कोणीही आपलं मार्गदर्शन करू शकत नाहीत- धर्मग्रंथसुद्धा. या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वोच्च ध्येय गाठू इच्छिणार्‍या माणसाला आपल्या अंतरंगाचं मार्गदर्शन
घेत सर्व संघर्ष स्वत:शीच करावा लागतो.
याप्रमाणे गांधीजी 'एकला चलो रे' तत्वानुसार आपल्या आध्यात्मिक मार्गावरून चालत राहिले व परिणामी ते स्वत: महात्मा बनले आणि समाजाचीही उन्नती करण्याचा प्रयत्न केला.

सध्याच्या काळात भारतात बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी यावर तातडीने ठाम उत्तर शोधणे ही काळाची गरज आहे.
आपण गांधीजींच्या विचारांचे अनुसरण करून स्वत:मध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन निश्चितच घडवून आणु शकतो. माझ्या मते आजच्या राजकीय नेत्यांमध्ये गांधीजींचे विचार रूजवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आजचे राजकीय नेते, विशेषत: जे तरूण आहेत त्यांनी 'गांधी विचार दर्शन' पदविका घेऊन त्यांचे विचार समजून घेणे व अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.
गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रते आपल्या जीवनात अंगिकारण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच आपण एक चांगला माणूस बनू शकू. तसेच एक सुसंस्कृत समाज तयार होईल आणि भारत एक उत्तम राष्ट्र बनेल यात शंका नाही.





संदर्भ ग्रंथ

1)     महात्मा गांधी आदिपर्व खंड 1 ला- प्यारेलाल
2)     महात्मा गांधी अखेरचे पर्व खंड 1 ला- प्यारेलाल
3)     महात्मा गांधी अखेरचे पर्व खंड 2 रा- प्यारेलाल
4)     गांधीजींची काही ठळक गुणवैशिष्ट्ये- नारायणभाई देसाई
5)     गांधी नवसर्जन की अनिवार्यता- काकासाहेब कालेलकर
6)     महात्मा गांधी जीवन और दर्शन- रामलाल विवेक
7)     मंगल प्रभात- महात्मा गांधी परंधाम प्रकाशन पवनार
8)     गांधी- जसे पाहिले जाणले विनोबांनी
9)     एकला चलो रे


























4 comments:

  1. अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण खूप छान...

    राष्ट्रपित्याबद्दल काही नवीन माहिती मिळाली..मार्गदर्शक असा त्यांचा जीवनपथ... अनुकरणीय

    अभिनन्दन डॉ अनिल...💐💐

    ReplyDelete
  2. nice post thanks for sharing informative blogs..keep sharing.Call 9871599566 for best web designing training course in delhi.
    Web Designing Course in Delhi
    Best web designing course institute in delhi

    ReplyDelete
  3. Ganesh Fund very inspiring & clear how to practice morals (Yam & Niyam)

    ReplyDelete